तंबाखूमुळे जगामध्ये दरवर्षी 60 लाख लोकांचा मृत्यू होतो. भारतात दर सहा सेकंदांनी एका व्यक्तीचा मृत्यु तंबाखूमुळे होतो . जगामध्ये सर्वत्र तंबाखू धूम्रपानाच्या स्वरूपात वापरली जाते. भारतात मात्र धूम्रपान व खाण्याच्या/ चघळण्याच्या स्वरूपात सुद्धा तंबाखूचा वापर होतो . सिगारेट, बिडी एवढेच गुटखा जर्दा , तंबाखू टाकलेले पान, तंबाखू नुसती खाणे हे सर्रास आढळून येते.
धुम्रपानामुळे फुफ्फुसाचा, तोंडाचा ,अन्ननलिकेचा, स्वर यंत्र, लघवीची पिशवी, रक्ताचा कॅन्सर आदी अनेक प्रकारचे कॅन्सर होतात . याखेरीज फुप्फुसाचे विविध आजार, वंध्यत्व, हृदयविकार, पक्षाघात, पॅरलिसीस, दात खराब होणे हे अजून सुद्धा काही आजार तंबाखू मुळे होतात. ते सुद्धा तेवढेच गंभीर आहेत. सिगरेट व तंबाखू मुळे डायबिटीस होण्याची शक्यता सुद्धा खूप वाढते. याखेरीज तंबाखू खाणे/ चघळणे , गुटखा यामुळे तोंडाचे कॅन्सर ,अन्ननलिकेचा कॅन्सर, स्वादुपिंडाचे कॅन्सर होतात. गरोदर अवस्था मध्ये तंबाखूचे सेवन केल्यास बाळाचे वजन कमी होते , तसेच बाळाला काही अपंगत्व येण्याची शक्यता असते.
तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करण्याचे प्रमाण लहान मुलांमध्ये, तसेच महिलांमध्ये सुद्धा आढळून येते. बरेच जणांना माहिती नसतं की आपण खात असलेल्या पदार्थ तंबाखू आहे. अगदी आकर्षक वेष्टनात ते उपलब्ध असतात की कोणाला तंबाखू असेल अशी शंकासुद्धा येत नाही. खेडेगावांमध्ये महिलांमध्ये मिश्री च्या बाबतीत ती सुरक्षित आहे असा गैरसमज आहे किंवा त्यामध्ये असलेल्या तंबाखूकडे कानाडोळा केला जातो. तंबाखूचा वापर एवढा सर्रास आढळतो की त्याला व्यसनांमध्ये मोजले सुद्धा जात नाही. डॉक्टर बरेचदा रुग्णाला विचारतात काही व्यसन आहे का ?,रुग्ण नाही असे सांगतात पण तंबाखू खातात का किंवा मिश्री लावतात का विचारल्यावर हो सांगतात ! भारतामध्ये अपघाताच्या आठ पट मृत्यू तंबाखूमुळे होतात. असे हे अत्यंत घातक व्यसन आहे.
तंबाखू /सिगारेट कशी बंद करणार
पहिल्यांदा तंबाखू ,सिगरेट, मिश्री हे व्यसन आहे हे आपल्याला मान्य करायला लागेल. तंबाखू किंवा सिगारेट बंद करण्यासाठी एक तारीख निश्चित करावी . तंबाखू हळूहळू कमी करून बंद करा. अचानक पूर्ण बंद करणे बहुतेक जणांना शक्य होत नाही. सिगारेट मात्र कधीही पूर्ण बंद करता येते . अगदी लवकरात लवकरची! आपले सगळे मित्र, कुटुंब, आपल्याबरोबर काम करणारे सहकारी या सगळ्यांना याबाबत सांगून ठेवावे म्हणजे ते आपल्याला व्यसन बंद करण्यास मदत करतील. लोकांना आपल्यासमोर तंबाखूचे कुठलेही व्यसन करू नये म्हणून सांगून ठेवावे .
सिगरेट आणि तंबाखू बंद केल्यास आपल्याला त्रास होणार आहे याची मानसिक तयारी ठेवा. काही जणांना तंबाखू बंद केल्यावर तोंडात सतत काहीतरी ठेवण्याची इच्छा होते. त्यासाठी आपण विलायची, लवंग किंवा लहान मुले खातात त्या गोळ्या घेऊ शकता. आपल्याजवळ असलेल्या सर्व सिगारेट व तंबाखू चे सर्व प्रकार टाकून द्या. तसेच त्यासाठी लागणारे डब्बे, काडेपेट्या, चंची -बटवे, लाईटर वगैरे सर्व टाकून द्या. तंबाखूचे व्यसन बंद करून दुसऱ्या व्यसनांच्या आहारी जाऊ नका. एकदा सिगरेट बंद केल्यावर एकही सिगरेट ओढू नका.
तंबाखूच्या सहज उपलब्धतेमुळे ती बंद करणे अवघड जाते. व्यसनमुक्तीची मनोमन इच्छा असेल तर मात्र ते सहज शक्य आहे . तंबाखू चे पदार्थ बंद केल्यावर काही काळ त्रास होऊ शकतो. जसे झोप न येणे, हातपाय थरथरणे ,चिडचिड, डोके दुखणे ,निराशा वगैरे . पण काही आठवड्यामध्येच हे त्रास कमी होतात. या काळात व्यायाम चालू करा. भरपूर पाणी प्या. त्यामुळे तंबाखू बंद केल्यामुळे होणारा त्रास कमी होतो. तंबाखूचे व्यसन बंद करण्याचा मदतीसाठी अनेक औषध उपलब्ध आहेत. वरील साध्या उपायांनी व्यसन सुटत नसेल तर डॉक्टरांची मदत जरूर घ्या.